Regarding implementation of campaign to complete annual e-KYC certification under PM Kisan Yojana
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन - कृषी विभाग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषी आयुक्तालय, कावेरी हॉल, सहावा मजला, डीटीसी सेंटर, म्हात्रे पूला जवळ, एरंडवणे , पुणे ४११००४,
संकेतस्थळ - www.pmkisan.gov.in,
ई-मेल- pmkisan-mh@gov.in
जा.क्र.कृ.गणना/पी.एम.किसान/नस्ती क्र.८/रजि. ८२४/२०२६,
दिनांक :- १८/०५/२०२६
प्रति,
१. विभागीय नोडल अधिकारी, पी.एम. किसान तथा विभागीय कृषि सहसंचालक, सर्व
२. जिल्हा नोडल अधिकारी, पी.एम. किसान तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सर्व
विषय :- पी.एम. किसान योजनेअंतर्गत वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण पुर्ण करणेसाठी मोहीम राबविण्याबाबत..
संदर्भ :- केंद्र शासनाचे अ.शा. पत्र क्र. ११-१/२०२३-FWS, दिनांकः ७ मे २०२६
राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान) ही योजना दि. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली असून, पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी रु. ६,०००/- इतकी आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. सदरहू योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे लाभ वितरीत करण्यात येत आहे. त्यानुसार योजनेच्या लाभार्थी माहितीची विश्वसनीयता अधिक मजबूत करण्यासाठी, गळती टाळण्यासाठी आणि PM-KISAN अंतर्गत लाभकेवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचण्याची खात्री करण्यासाठी, केंद्र शासनाने सर्व पी.एम. किसान लाभार्थ्यांसाठी वार्षिक e-KYC प्रमाणिकरण पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. या संदर्भात, सर्व DBT योजनांअंतर्गत लाभार्थ्यांसाठी १००% बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार, पी.एम. किसान अंतर्गत सर्व लाभार्थ्यांसाठी मजबूत आणि सातत्यपूर्ण प्रमाणिकरण सुनिश्चित करण्यासाठी वार्षिक e-KYC प्रमाणिकरण लागू करण्यात आले आहे. पी.एम. किसान प्रणालीअंतर्गत CSC केंद्रांमार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा PM-KISAN मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी e-KYC पूर्ण करता येत आहे. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करून ज्या लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत त्यांच्यासाठी फेस ऑथेंटिकेशन द्वारे ईकेवायसी प्रमाणिकरण सुलभ करण्याची महत्त्वाची भूमिका बजावावी. पी.एम.किसान योजनेच्या आगामी हप्त्यासाठी पात्र खऱ्या लाभार्थ्यांची वेळेत पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने १००% उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू वर्षासाठीची वार्षिक e-KYC मोहीम दि. ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाने संदर्भीय अ.शा. पत्रान्वये निर्देश दिलेले आहेत.
या अनुषंगाने सुचित करण्यात येते की, केंद्र शासनाच्या संदर्भीय अ.शा. पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार पी.एम.किसान योजनेचा लाभ केवळ खऱ्या व जिवंत लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचण्याकरीता केंद्र शासनाने सर्व पी.एम. किसान लाभार्थ्यांसाठी वार्षिक e-KYC प्रमाणिकरण पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे. पी.एम.किसान प्रणालीअंतर्गत सामाईक सुविधा केंद्र (CSC) केंद्रांमार्फत बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा PM-KISAN मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींनी e-KYC प्रमाणिकरण पूर्ण करता येत आहे.
यासाठी गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहित करून ज्या लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत त्यांच्यासाठी फेस ऑथेंटिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण सुलभ करण्याबाबत दक्षता घेऊन यथायोग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे. पी.एम. किसान योजनेच्या आगामी हप्त्यासाठी पात्र खऱ्या लाभार्थ्यांची वेळेत पात्रता सुनिश्चित करण्यासाठी आणि नियोजनबद्ध पद्धतीने १००% उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चालू २०२५-२६ या वर्षासाठीची वार्षिक e-KYC मोहीम दि. ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. वरील बाबींच्या अनुषंगाने पात्र लाभार्थीची ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्यात यावी.
१. पी.एम. किसान योजनेच्या सन २०२५-२६ या वर्षासाठीची वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण दि. ३० जून २०२६ पूर्वी पूर्ण करण्याकरीता दि. २० मे २०२६ पासून राज्यात सर्वदूर मोहीम राबविण्यात यावी.
२. पी.एम. किसान योजनेच्या पात्र लाभार्थीनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) केंद्रांमार्फत बायोमेट्रिक प्रमाणिकरण किंवा PM-KISAN मोबाईल अॅपद्वारे फेस ऑथेंटिकेशन या दोन पद्धतींपैकी कोणत्याही एका पध्दतीने वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करण्याबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणावर प्रचार प्रसिध्दी करण्यात यावी.
३. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार निर्धारित कालमर्यादेत सर्व लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक/फेस ऑथेंटिकेशन आधारित e-KYC प्रमाणिकरण मोहीम पद्धतीने तातडीने पूर्ण करण्याबाबत क्षेत्रीयस्तरावरील तालुका नोडल अधिकारी, पी.एम. किसान तथा तालुका कृषी अधिकारी / कर्मचारी यांना निर्देश द्यावेत.
४. गाव पातळीवरील ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी गावातील सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहित करून फेस ऑथेंटिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे. तसेच ज्या लाभार्थ्यांना हालचालीसंबंधी अडचणी आहेत त्यांच्यासाठी स्वतः ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (VNOs) यांनी वैयक्तिक लक्ष घालून फेस ऑथेंटिकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण पुर्ण करावे.
५. पी.एम.किसान योजनेच्या वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण मोहिमेदरम्यान पात्र लाभार्थीना ई-केवायसी प्रलंबिततेच्या कारणांस्तव विनाकारण अपात्र मार्क करण्यात येऊ नये.
६. जिल्हा नोडल अधिकारी, पी.एम. किसान तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी मोहीमस्वरूपात ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करण्याबाबत नियोजन करावे. तसेच योजनेची ई-केवायसी प्रमाणिकरण पुर्ततेबाबत क्षेत्रीय कर्मचारी यांचा साप्ताहिक आढावा घेऊन जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थीचे ई-केवायसी प्रमाणिकरण पुर्ण होईल याबाबत दक्षता घ्यावी.
७. वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण पुर्ततेच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्टे निश्चित करून तसेच नियतकालिक आढावा बैठका घेऊन विभागस्तरावर नियमित आणि काटेकोर निरीक्षण करण्यात यावे.
उपरोक्तप्रमाणे केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम.किसान) योजनेच्या पात्र लाभार्थीचे वार्षिक ई-केवायसी प्रमाणिकरण पुर्ततेसाठी दि. २० मे २०२६ पासून राज्यात सर्वदूर मोहिम राबविण्यात यावी. तसेच सदर मोहीम यशस्वी होणेसाठी काटेकोर नियोजन करावे. त्याचप्रमाणे केलेल्या कार्यवाहीबाबत कृषी आयुक्तालयास उलटटपाली अवगत करावे. पी.एम. किसान योजनेच्या लाभापासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी.
सूरज माढरे
आयुक्त कृषी
तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पी.एम. किसान, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई ३२
२. अध्यक्ष, जिल्हास्तरीय समिती, पी.एम. किसान तथा जिल्हाधिकारी, सर्व
३. कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे